श्रीपरमानंदस्वामी

About the Author


श्री अविनाश मोरेश्वर लिमये तथा श्रीपरमानंदस्वामी हे श्रीदात्तात्रेयांच्या थोर आणि उदात्त अशा गुरुशिष्य परंपरेतील आजच्या काळातले कार्यरत सत्पुरुष आहेत. त्यांचा जन्म दिनांक २८ जुलै १९४२ रोजी श्री मोरेश्वर वासुदेव लिमये तथा श्रीअवधूतस्वामी महाराज आणि सौ सरस्वती लिमये यांच्या पोटी झाला. त्यांनी पदार्थ विज्ञान (Physics) या विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची M.Sc. ही पदवी प्राप्त केलेली असून पवई मुंबई येथील Indian Institute of Technology या जग विख्यात संस्थेत त्यांची ३६ वर्षे सेवा रुजू आहे.  श्रीपरमानंदस्वामी यांनी त्यांचे पिता आणि सद्गुरुं श्री मोरेश्वर वासुदेव लिमये तथा श्रीअवधूतस्वामी महाराजांच्या महानिर्याणानंतर स्वताच्या राहत्या घरात गुरुशिष्य परंपरेचे, सर्व जीवांच्या उद्धाराचे आणि प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे. श्रीपरमानंदस्वामी हे व्यावसायिक अथवा रुढार्थाने कवी किंवा लेखक नाहीत. मात्र त्यांच्याकडून घडत असलेल्या आध्यात्मिक कार्याच्या ओघात त्यांच्याठायी प्रेमरसाने ओथंबलेली अशी वैविध्यपूर्ण भक्तिकाव्ये प्रसवली, तसेच उदंड असे स्वानुभवाचे ग्रंथलेखन स्फुरले.  त्यांनी प्रभुरामाच्या प्रेमस्वरूप अवस्थेचे मनोज्ञ दर्शन घडविणारा "हा राम माझा", श्रीकृष्ण आणि राधा यांच्या भक्तीऐक्याचे मनोहारी दर्शन घडविणारा "कृष्ण सखा माझा". कृष्णाच्या अंत:करणातील गूज उलगडणारा "कृष्ण परमात्मा" आणि दत्तात्रेयांच्या अवतार मालिकेतील चरित्रांचे रहस्य प्रकटविणारा "दत्त हाची अवधूत" या अद्भुत आणि आगळ्या वेगळ्या ग्रंथांचे लेखन केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी "एक शोध आनंदाचा" आणि "एक प्रवास आनंदाचा" अशा दोन आध्यात्मिक कादंबरींचेही लेखन केलेले आहे. "आनंदाचे डोही" या त्यांच्या काव्य संग्रहामध्ये  त्यांच्या अंत:करणाठायी प्रसवलेली भक्तीकाव्ये अंतर्भूत आहेत. आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी देखील त्यांचा भक्तीकार्य घडविण्याचा उत्साह एखाद्या चिरतरुणासारखा आहे. 
श्रीपरमानंदस्वामी