श्री.सुधीर वासुदेव कांदळकर.

About the Author


सुधीर वासुदेव कांदळकर यांचा जन्म दादर, मुंबई येथे १९५२ साली झाला. प्रथम नोकरी महाराष्ट्र राज्य, विक्रीकर भवन, माझगांव मुंबई येथे केली. नंतर त्यांनी  औषधी उत्पादक कंपन्यात मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट म्हणून नोकरी स्वीकारली. या अनुभवानंतर व्यवस्थापनात पदार्पण केले. एक्साईज आणि कामगार कायद्यांचे पालन हे देखील कार्यक्षेत्रात आले. व्यवस्थापक म्हणून दोन कारखाने उभे करण्याचा अनुभव मिळाला.  बालपणापासूनचा वाचनाचा छंद सुरूच होता. कायदेविषयक मजकूर लिहितांना विषयाची स्पष्ट, नेमकी, मुद्देसूद, शिस्तबद्ध आणि सोपी मांडणी करायची सवय लागली.    
      २००८ साली ललित लेखन सुरू झाले. प्रवासाची आवड होतीच. त्यामुळे प्रवासवर्णन लिहिणे ओघानेच आले. शास्त्रीय विषयावरील वाचन शाळेपासून सुरू होते. त्यामुळे खासकरून सेवानिवृत्तीनंतर शास्त्रीय विषयावरील लेखन पण महाजालावर झाले. हिटलरचे पूर्वायुष्य, व्यावसायिक क्षेत्रातली स्त्रीपुरुषातली स्पर्धा अशा वेगळ्या विषयावरील लेखन तसेच मनोरंजक आठवणीपर लेख असेही अवांतर लेखन महाजालावर झाले. मनमोकळे आणि त्वरित वाचायला मिळणारे प्रतिसाद हे महाजालावरील लेखनाचे एक खास वैशिष्ट्य. रसिक आणि विद्वान वाचकांच्या मनमोकळ्या प्रतिसादांतून लेखनातील उणीवा उतरोत्तर कमी होऊन शैली विकसित होत गेली.
  
श्री.सुधीर वासुदेव कांदळकर.